श्री गणपती आरती (सुखकर्ता दुःखहर्ता)
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥ १ ॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रें मनकामना पुरती ॥ धृ ॥
रत्नखचित फरा तुझ गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुमकुमकेशरा ।
हिरेजडित मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया ॥ २ ॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती...
लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ॥ ३ ॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती...
मराठी अर्थ: सुख देणारा, दुःख दूर करणारा, सर्व संकटांचा नाश करणारा — ज्याची प्रेमळ कृपा भक्तांवर सतत राहते. संपूर्ण शरीराला सुंदर शेंदराची उटी लावलेला आणि गळ्यात मोत्यांची माळ शोभणारा अशा हे मंगलमूर्ती देवा, तुझा जयजयकार असो. तुझ्या केवळ दर्शनानेच मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात.